महाराष्ट्रातील ITI विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; 1,399 युवकांना रोजगारक्षम कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण!! | Maharashtra ITI Training Update
Maharashtra ITI Training Update
Maharashtra ITI Training Update : महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) युवकांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी ‘उन्नती’ संस्थेच्या माध्यमातून व्यापक कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेला जात आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय ITI आणि शासकीय तंत्रनिकेतनांमधील 1,399 युवकांना 165 तासांहून अधिक कालावधीचे रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये संस्थेच्या Learning Management System चा देखील वापर करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील युवकांना सर्वाधिक लाभ
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ITI मधील 326 युवकांनी या प्रशिक्षणाचा सर्वाधिक लाभ घेतला आहे. त्यानंतर सोलापूर येथील 204 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. RTM शासकीय ITI, मोजरी येथील 93, जरिपटका येथील 81 युवकांचा प्रशिक्षणात समावेश आहे. बुलडाणा आणि SCP ITI, किले आर्क, छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी 72 युवक, धामणगाव-अमरावती येथील 71 आणि अक्कलकोट येथील 68 युवकांनीही प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
या संस्थांमधील युवकांचाही सहभाग
याशिवाय बल्लारपूर येथील 67, कोल्हापूर 63, सेलू 56, मौदा 39, पार्टूर 30, कराड 30 आणि गोंदिया येथील 29 युवकांनी प्रशिक्षण घेतले आहे. शासकीय ITI (महिला), अकोला येथील 28, शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव, नाशिक येथील 26, पिंपरी-चिंचवड येथील 23 आणि अकोला येथील 21 युवकांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 1,399 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
युवकांना प्रशिक्षण पूर्णपणे मोफत
या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे युवकांना प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शासकीय संस्थांमधील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. इन्फोसिस, एक्समोबील यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम मोठ्या स्तरावर राबविणे शक्य होत असल्याचे ‘उन्नती’ संस्थेने म्हटले आहे. ‘उन्नती’ ही सोशल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी व सूचीबद्ध होणारी देशातील पहिली स्वयंसेवी संस्था असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
तांत्रिक कौशल्यांसोबत संवादकौशल्यावर भर
ITIमध्ये युवकांना संबंधित तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण आधीच दिले जाते. त्यामुळे ‘उन्नती’च्या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक शिक्षणासोबतच संवादकौशल्य, कार्यस्थळावरील आवश्यक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारासाठीची तयारी यावर विशेष भर देण्यात येत आहे. युवकांना केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम न करता प्रत्यक्ष नोकरीच्या वातावरणासाठी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध ITIमध्ये राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाबाबत संबंधित संस्थांकडून अभिप्राय घेऊन उपक्रमाच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्याची अपेक्षाही ‘उन्नती’ने व्यक्त केली आहे.
20 हजार युवकांपर्यंत प्रशिक्षण पोहोचविण्याचे उद्दिष्ट
सध्या 1,399 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असले तरी हा उपक्रम आणखी व्यापक करण्याची तयारी आहे. महाराष्ट्रातील विविध ITIमध्ये प्रशिक्षणाचा विस्तार करून 20 हजारांहून अधिक युवकांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ‘उन्नती’ने निश्चित केले आहे. राज्यातील युवकांना रोजगाराच्या बदलत्या संधींसाठी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ITIमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवकांना तांत्रिक ज्ञानासोबत संवाद, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये मिळाल्यास त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होऊ शकते.
Maharashtra ITI Training Update
महाराष्ट्रातील आयटीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे, उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे. अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय ‘जबील’ कंपनीने राज्यातील काही निवडक आयटीआय संस्थांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला असून, या उपक्रमाअंतर्गत अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. तरुर्णांना रोजगाराभिमुख तसेच स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवत आहे.
जागतिक स्तरावर वापरात असलेले नवे तंत्रज्ञान आयटीआयच्या विद्याध्यर्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून जबौल कंपनीचा हा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. यासंदर्भात जबील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख गुंडूराव पाटील यांनी बुधवारी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली. या बैठकीत निवडक आयटीआय संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, प्रशिक्षकांचे विशेष प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना उद्योग सज्ज कौशल्ये देणे तसेच समकक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यभर व्यापक प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अन्य नामांकित कंपन्यांचा सहभाग वाढवण्याचे प्रयत्नही विभागामार्फत केले जातील, असे त्यांनी सांगितले.