खुशखबर! आता तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव! – MPSC New Secretary Tukaram Munde
MPSC New Secretary Tukaram Munde – अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता आयोगावर सचिव म्हणून काम पाहणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाची धुरा आता राज्याचे डॅशिंग आणि शिस्तप्रिय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पुणे आणि राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपालकर यांची डेप्युटेशन मुदत संपवून त्यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले होते. पेपरफुटी, परीक्षांमधील सातत्यपूर्ण विलंब आणि प्रशासकीय अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करत हरपालकर यांच्या जागी कडक शिस्तीचे अधिकारी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे समजते. या नवीन निर्णयामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वाटेवर आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळे एमपीएससीच्या कारभारात मोठी पारदर्शकता आणि वेग येईल, अशी आशा लाखो परीक्षार्थी व्यक्त करत आहेत. मुंढे हे आपल्या बेधडक, प्रामाणिक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. आयोगासमोरील रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक वेळेत पूर्ण करणे, निकाल वेळेवर जाहीर करणे आणि परीक्षा पद्धतीतील गैरप्रकार रोखणे ही मोठी आव्हाने आता त्यांच्यासमोर असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीचा मान ठेवून सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा विश्वातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मुंढे हे एमपीएससीचा विस्कळीत झालेला गाडा कसा रुळावर आणतात आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कसा संपादन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलानंतर आता लाखो उमेदवारांच्या नजरा आगामी परीक्षांच्या नियोजनाकडे लागल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळेMPSC मधील अंतर्गत भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि परीक्षा प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः रखडलेल्या मुलाखती, प्रलंबित निकाल आणि वारंवार बदलणारे परीक्षांचे वेळापत्रक या तीन मुख्य आघाड्यांवर त्यांना तातडीने काम करावे लागणार आहे. विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, नवीन सचिवांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे. एकूणच, या फेरबदलामुळे एमपीएससीच्या पारदर्शकतेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह मिटवून विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेची आणि विश्वासाची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे.