TCS मध्ये AI आधारित नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध! – TCS AI Careers Jobs
TCS AI Careers Jobs- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने आघाडीची आयटी कंपनी टीसीएस आता एआय आणि डिजिटल कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या अंदाजानुसार पुढील काळात होणाऱ्या एकूण भरतीपैकी सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांकडे या क्षेत्रांतील कौशल्ये असतील. यावरून संपूर्ण उद्योगात तंत्रज्ञानाविषयक गरजा कशा बदलत आहेत, हे दिसून येते. सप्टेंबर तिमाहीत टीसीएसच्या एकूण महसुलापैकी १० टक्के वाटा एआय-संबंधित कामांचा होता, याच पार्श्वभूमीवर ही भरती योजना आखली जात आहे. एआय व्यवसायाचा विस्तार केल्यास नफ्याचे प्रमाण सुधारण्यासही मदत होऊ शकते, असे कंपनीला वाटते. कारण सध्या हे प्रमाण कंपनीच्या अपेक्षित पातळीपेक्षा कमी आहे.
टीसीएसने दुसऱ्या तिमाहीत ४,५०० कर्मचाऱ्यांची भरती केली. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांकडे एआय क्षेत्रातील विशेष कौशल्ये होती, तर जवळपास ८० टक्के कर्मचारी हे कंपनीच्या व्याख्येनुसार ‘न्यू-एज टेक्नॉलॉजी टॅलेंट’ या श्रेणीतील होते, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यन यांनी पीटीआयला दिली. सुब्रमण्यन यांनी सांगितले की, भरतीचा हा कल असाच कायम राहण्याची टीसीएसला अपेक्षा आहे आणि बाजारात आवश्यक ती गुणवत्ता असलेले मनुष्यबळ उपलब्ध आहे.
नव्या पदवीधरांना फायदा
नव्या तंत्रज्ञानाची चांगली ओळख असल्याने नवीन पदवीधरांना कदाचित काहीसा फायदा होऊ शकत असला, तरी एआय कौशल्यांच्या वाढत्या मागणीचा लाभ अनुभवी कर्मचाऱ्यांनाही होऊ शकतो, असे टीसीएसला वाटते. ही संधी साधता येणे हे संबंधित व्यक्तीची शिकण्याची तयारी आणि बदलत्या तांत्रिक गरजांनुसार स्वतःला जुळवून घेण्याची वृत्ती यांवर अवलंबून असेल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृथिवसन यांनी सांगितले.
“जर एखादा मध्यम-स्तरावरील इंंजीनिअल शिकण्यास उत्सुक असेल, तर त्याचा मोठा फायदा होतो. कारण त्याला तंत्रज्ञानाचे स्वरूप आणि संबंधित कार्यक्षेत्र यांची समज असते”, असे कृथिवसन म्हणाले.
आयटी क्षेत्रातील अनिश्चितता
टीसीएस आपला एआय व्यवसाय उभारण्यावर भर देत असतानाच, भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेतील स्थलांतरविषयक नियमांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचाही सामना करावा लागत आहे. अमेरिकन सरकारने अलीकडेच टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक यांसारख्या आठ तंत्रज्ञान कंपन्यांसाठी ग्रीन कार्ड अर्जांची प्रक्रिया स्थगित केली आहे.